नवसाला पावणारी कोळगावची
श्री कोळाईदेवी !!!
कोळगाव व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान
महा शिक्षण टाइम्स :
बारा वाड्या आणि तेरावे कोळगाव अशी गावाची ओळख. गावचे आराध्य दैवत कोळाईदेवी हे मुख्य दैवत आहे. गावातील लोक तसेच पंचक्रोशीतील भाविक कोळाईला मानतात. त्यामुळे कोळगाव हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
कोळाईदेवीची आख्यायिका मोठी गमतीदार आहे.साधारणपणे पाच सहाशे वर्षांपूर्वी कोळगाव येथे कोळी समाज मोठ्या प्रमाणावर होता. येथील कोळ्यांची एक मुलगी सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी आली. सासर्याने समजूत घातल्यावर तिची म्हणजेच कोळाईची सासरी रवानगी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नदीच्या कडेने सासरे पुढे व कोळाई मागे असे चालले होते. बऱ्याच अंतरावर म्हणजे सध्याच्या मंदिराजवळ गेल्यावर तिच्या सासर्याने मागे वळून पाहिले असता कोळाई नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी कोळाईला डोंगरावरून हाक मारली. तेव्हा साधारण एक किलोमीटर अंतरावरील नदीजवळ कोळाईने ओ दिली. सासरे पुन्हा खाली नदीत आले. तर कोळाई तेथे नव्हती. त्यांनी पुन्हा आवाज दिला तर कोळाईने डोंगरावर आवाज दिला. सासरे डोंगरावर गेले असता पुन्हा तेथे कोळाई दिसली नाही. नदीजवळ आवाज दिला होता तेथे तिच्या पायाचा ठसा खडकावर उमटला होता. त्या ठिकाणाला ग्रामस्थांनी मावलाई डोह असे संबोधले व त्याची जपवणूक केली.
ग्रामस्थांनी माळावर देवीचे मंदिर उभारण्यास सुरुवात केली. प्रथम गाभारा बांधला. बांधकाम दगडी आहे. मोठमोठ्या शिळा एकावर एक ठेवून लाकडाचा वापर न करता गाभारा तयार करण्यात आला. गाभार्यात जाण्यासाठी चार फुटी दरवाजा आहे. गाभाऱ्यासमोर लाकडी सभामंडप करण्यात आला. सभा मंडपासमोर चार ओवऱ्या बांधण्यात आल्या. सभा मंडपासमोर दिपमाळ आहे. कालांतराने मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीने करण्यात आले.सभामंडप लोखंडी व स्टील च्या साह्याने बांधण्यात आला.
मंदिराच्या सभोवती आतील बाजूस फरशी बसविण्यात आली. मंदिराच्या बाहेरील भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. श्री कोळाईदेवी च्या जुन्या मूर्तीच्या ठिकाणी नवीन मूर्ती बसवण्यात आली.जुनी मूर्तीही तेथेच बाजूला विधिवत बसवण्यात आली. गाभाऱ्यामध्ये खालील बाजूस नवीन फरशी टाकण्यात आली.
गेल्या काही वर्षात अनेक देणगीदार, भाविकांनी दिलेल्या देणगी मधून कुस्ती आखाडा दुरुस्ती, मंदिराची दुरुस्ती, संपूर्ण मंदिराला आतील व बाहेरील बाजूस रंगकाम, परिसरात पेविंग ब्लॉक बसविणे, मंदिराला लोखंडी दरवाजे बसविणे, मंदिराच्या आतील गाभार्याचे पीओपी व रंगकाम करणे, विविध प्रकारची झाडे लावून सुशोभिकरण करणे,अशी विविध प्रकारची कामे भाविकांनी कोळाईदेवीच्या श्रद्धेपोटी दिलेल्या दहा ते बारा लाखांच्या देणगी मधून मंदिर व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. आमदार निधीतून दहा लक्ष रुपयांची मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यात आली. कोळगाव मंदिराचा परिसर सुशोभत करण्यात आला आहे.
मंदिर व परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आले मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर विद्युत लावण्यात आले आहेतयामध्ये कोळगाव ग्रामपंचायतचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, कारखान्याचे आजी-माजी संचालक,यात्रा कमिटी तसेच गावातील विविध पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, तरुण मंडळे , ग्रामस्थ व थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.








