सर्व सभासद बंधू-भगिनींना नमस्कार…
सन २०२२ मध्ये बँकेची पंचवार्षिक निवडणूक होऊन सभासदांनी रयत सेवक मित्र मंडळाच्या पॅनेलला बहुमताचा कौल देऊन ३३ वर्षानंतर बँकेमध्ये सत्ता स्थापनेची संधी दिली. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत बँक आणि सभासदहित साधण्याच्या दृष्टीने त्या संपूर्ण वर्षभरात अनेक चांगले निर्णय घेऊन आणि त्याची अंमलबजावणी करून निवडणुकीत काढलेल्या जाहीरनाम्याची एका वर्षातच ७५% पूर्तता केली. सभासदांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असणारे व्याजदरात कपात, ५% रिबेट, १२.५ % लाभांश (डिव्हिडेंट), मागील वर्षातील राहिलेला ३%टक्के लाभांश (डिव्हिडेंट), ५० लाखापर्यंत कर्जमाफीची सभासद कल्याण योजना हे आणि असे अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पारदर्शक आणि सभासदहिताचा कारभार केला. मात्र सत्तेच्या लालसेने अविश्वास ठराव होऊन बँकेमध्ये सत्तांतराला सामोरे जावे लागले. पुढील वर्षभरात तत्त्वांशी तडजोड न करता विरोधी पक्ष म्हणून न्याय्य भूमिका घेतली. राजकारणाचा पट मांडून बसलेल्या काही विरोधक आणि हितशत्रूंनी केलेल्या करामती त्यांच्यावरच उलटवून त्यांनाच चेकमेट करत पुन्हा एकदा दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सत्तांतर घडवून चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. आज २०२५ मार्च २०२५ रोजी चार महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवून विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे हे आवश्यक होते. मागील १२० दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त वेळ बँकेसाठी देऊन बँके पुढील आव्हाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
१) मागील वर्षभरात ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात वाढ झालेली असल्यामुळे एकीकडे कर्ज घेणारे सभासद आणि बँकेकडे अतिरिक्त वाढलेल्या ठेवी यामुळे ७३% वरून ६३% पर्यंत खाली आलेला बँकेचा सिडीरेशो यांचा बॅलन्स करणे ही तारेवरची कसरत होती आणि आहे. रिपोरेट कमी झाल्यानंतरही अद्याप इतर बँकांनी ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात कपात केलेली नाही. तरीही कर्जदार सभासदांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून कर्जाच्या व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात करण्याचे धाडस केले.
२) कर्ज हेच बँकेचे उत्पन्नाचे मुख्य साधन असल्यामुळे कर्जाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असणाऱ्या ठेवींचा बोजा हे एक मोठे आव्हान आहे. पुढील तीन महिन्यात या ठेवी मॅच्युअर होतील तेव्हा त्याचा परिणाम पुढील मार्चएंडला जाणवणार आहे. त्याचाही विचार करून ताळमेळ राखणे गरजेचे आहे. तरीही मागील वर्षभरात कर्जावर भरलेल्या व्याजातून सभासदांना दिलासा मिळावा यासाठी मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी २% रिबेट देण्याचा निर्णय कालच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला.
३) सांगली येथे संस्था विभागीय कार्यालय आणि बँकेची संयुक्त इमारतीचे कामाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कर्जत येथील इमारतीचेही काम सुरू करणे आवश्यक आहे. मागील वर्षी इमारत बांधकामासाठी करण्यात आलेल्या ३ कोटीची तरतूदीमधून कपात करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये २ % लाभांश (डिव्हिडेंट) वाढवून देण्यात आलेला होता. मात्र त्यामुळे इमारत बांधकाम निधीची पूर्तता करणे यावर्षी आवश्यक आहे. (गंमत म्हणजे मागील वर्षी इमारत निधी कमी करून लाभांश द्या म्हणणारेच कर्जत शाखेचे बांधकाम कधी सुरू होणार म्हणून चौकशी करत आहेत.)
४) मागील वर्षभरात रखडलेल्या कामापैकी बँकेसाठी सर्वात महत्त्वाचे असणारे काम म्हणजे बँकेचे डाटा सेंटर. ऑनलाइन बँकिंग च्या दृष्टीने सुरक्षित आणि व्यवस्थित डाटा सेंटर हे काळाची गरज आहे. त्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये योट्टा कंपनीशी करार करून बँकेचे डी आर आणि डीसी सेंटर क्लाऊड वरती शिफ्टिंगचे काम सुरू आहे. यु. पी. आय. सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने बँकेने सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मंजुरीनंतर गुगल पे फोन पे प्रमाणे आपल्यालाही बँकेच्या ॲप मधून यूपीआय पेमेंट करता येणार आहे. काही दिवसातच नवीन रुपात आणि जास्तीत जास्त सुविधांसह बँकेचे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. येत्या महिन्याभरात आपण सुरक्षित आणि सुलभ बँकिंग सुविधेचा वापर सुरू करत आहोत. त्यामुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
५) काल झालेल्या संचालक मंडळाच्या सविचार सभेत मागील दोन वर्षापासून प्रलंबित असणारा सेवक वेतन कराराचा प्रश्न मार्गी लागून बँकेतील सेवकांनाही दिलासा मिळालेला आहे. वेतनामध्ये ७.७५% च्या वाढीसह इतर अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.
६) दिवाळीच्या काळामध्ये अविश्वास, सत्तांतर अशा राजकीय घडामोडीमुळे सहविचार सभा होऊन दरवर्षीप्रमाणे सेवकांना दिवाळी भेट देण्याचा निर्णय होऊ शकला नव्हता. दिवाळीच्या पाडव्याऐवजी किमान गुढीपाडव्याच्या निमित्ताने बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५०००/- याप्रमाणे अनपेक्षित भेट देऊन सुखद धक्का दिलेला आहे.
७) वेतन करारासोबत पाडवा भेट मिळाल्यामुळे सेवक वर्ग संतुष्ट झालेला असतानाच मार्चएंड नंतर वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन शाखांना १५,००० प्रथम, १२,५०० द्वितीय आणि १०,००० तृतीय याप्रमाणे बक्षीसही दिले जाणार आहे.
८) 25 मार्च रोजी पुणे येथील कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट देऊन आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान, डिजिटल बँकिंग सेवा, कर्ज धोरणे, ठेवी व्यवस्थापन, गुंतवणूक संधी आणि ग्राहक सेवा प्रणाली याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली. बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनासंबंधी सखोल माहिती मिळवणे तसेच गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करणे हा उद्देश होता. पुढील काळात बँकेच्या सर्व कर्मचारी व संचालक मंडळाचे प्रशिक्षण कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून घेतले जाणार आहे.
९) मागील वर्षातील गुणवंत सभासद पाल्य, उत्कृष्ट कामगिरी केलेले सभासद आणि सेवानिवृत्त सभासद यांचा सत्कार समारंभ बँक वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. सुंदर ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि बक्षीस रकमेत वाढ करून १०००/- रुपये प्रत्येकी बक्षीस वितरण करण्यात आले. बँकेच्या सर्व शाखांच्या कार्यक्षेत्रात सुंदर आणि नेटके नियोजन करून हे कार्यक्रम पार पडले.
१०) सेवकांच्या बदली व बढती संदर्भात निश्चित धोरण ठरवून सर्वांना समान न्याय देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला असून लवकरच अतिशय पारदर्शकपणे व नियमानुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच थकबाकीत असलेल्या प्रकरणामध्ये कडक कारवाईचे धोरण राबवण्यात येत आहे.
आज बँकेच्या १६०० कोटीपेक्षा जास्त ठेवी असून १००० कोटीपेक्षा जास्त कर्जवाटप झालेले आहे. २६०० कोटीचा व्यवसाय आज बँक करत असून ३००० कोटीचा टप्पा पार करण्यासाठी बँकेची वाटचाल सुरू आहे. अर्थात विरोध करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी काहीच मुद्दे नसल्यामुळे कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असला तरीही बँकेत काहीही चुकीचे व नियमबाह्य होणार नाही आणि कुठेही बँकेचे नुकसान होऊन बँकेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागणार नाही, याची ग्वाही यानिमित्ताने देत आहे.
न मैं गिरा न मेरी उम्मीदे… लेकीन मुझे गिराने की कोशिश में कई गिरे…
धन्यवाद.
श्री. नंदकिशोर गायकवाड.
चेअरमन
आणि सर्व संचालक मंडळ
दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा.






